मुले झाली किल्लेदारमुले झाली किल्लेदार .....
                  सर मग एवढा मोठा किल्ला कसा बांधत असतील हो ? असा प्रश्न माझ्या वर्गातील मुलांनी मला विचारला, मी इयत्ता ४ था चा वर्गशिक्षक आहे. इतिहासात  किल्ल्यांचा उल्लेख वारंवार येतो मग त्याच्या निर्मिती बद्दल मुलांना आणि आम्हाला मोठी उत्सुकता लागली त्याबद्ल गुगलवर काही माहिती आम्हाला भेटली मात्र प्राजक्ता म्हणाली, सर आपण पण बनवूया की किल्ला !!! कसा, काय काय करावे लागेल, साहित्य काय, वेळ किती लागेल,जागा कोठे,वस्तू कशा जमवायच्या  या सर्व बाबींचे गणित आम्ही जुळवले आणि बस्स ठरले कि किल्ला बनवायचाच. 
                        शाळा अगदी सह्याद्रीच्या डोंगरावर उंचावर त्यामुळे सर्वत्र माळरान पडीक मोकळी जमीन, मी म्हणालो की भरपूर दगड लागतील तर प्रत्येक मुलांनी छोट्या सुट्टीत आणि मोठ्या सुट्टीत काही दगड परिसरातून जमवायचे ,तास बुडवून हे करायचे नाही आणि उरलेले काम कार्यानुभवाच्या तासिकेत मार्गी लावायचे ठरले.अगदी ८ ते १० दिवसात ४ थी च्या विद्यार्थ्यांनी आवश्यक दगड गोळा केले.मग त्यासाठी लागणारी माती अमाच्या आजूबाजूला मिश्र प्रकारची माती मग मुले म्हणाली सर आपण धान्य चाळतो ना त्याची चाळणी आणून माती चाळूया आणि दुपारी जेवणानंतर माती चाळण्याचा आमचा उद्योग सुरु झाला.२ ते ३ दिवसात आम्ही माती जमवून चाळून घेतली.त्यासाठी जुनी बारादाण्याची पोती लागणार होती काही मुलांनी घराची जुनी पोते आणली त्याचे विशिष्ट भाग केले.आता किल्ला बनवायचा कोठे ? एक जागा ठरवली जी योग्य होती,प्रश्न होता तो पाण्याचा ,प्रचंड दुष्काळ असलेला हा भाग पाण्याचा दुष्काळ तरीही प्रत्येक मुलांने आपापल्या घरून दररोज १ बाटली आणण्या ऐवजी २ बाटल्या आणायच्या  आणि शाळेतील पिंपात ५ ते ६ दिवस पाणी साठवले.मात्र एवढ्यात काही पाण्याचे आमचे जमेना शेवटी आशिषने सांगितले की आमच्या रस्त्यावर एक हापसा (हातपंप) आहे पण त्याला क्वचितच पाणी येते आणि ठरले मग तेथून पाणी आणायचे आणि त्याच्याच बाजूला काळी माती असलेले एकच शेत होते त्यांना विनंती करून पोत्यात मातीही तेथूनच आणली.एकंदरीत आवश्यक वस्तू जमवल्या आता वेळ होती प्रत्यक्ष वास्तू बनवण्याची.
                              किल्ला निर्मितीचा दिवस ठरला आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करण्याचे ठरले कारण सर्व गोष्टी खूप कष्टातून मिळवल्या होत्या.मग प्रत्येकाला चिखल करावासा वाटू लागला मग कामाची विभागणी करून काही मुलांनी दगड मांडावे, काहीजण मातीचा चिखल करतील ,काही मुले जुन्या विटांची तटभिंत करतील अशी काम विभागणी सुरु झाली.दगड मांडले कि चित्रातील किल्ल्याप्रमाणे आकार काही दिसेना किती तरी वेळा दगड बाजूला सारून पुन्हा पुन्हा मांडणी केली.मुले मग प्रश्न विचारू लागले शिवरायांच्या काळात हे सर्व साहित्य कसे जमा करत असतील, इतक्या उंचावर कसे घेवून जात असतील? याची त्यांना जाणीव होऊ लागली.मग दगड मांडणी कशी तरी पूर्ण झाली आणि बराच वेळ गेल्याने चिखलाचं काम अपूर्णच राहिलं. तो तसाच ठेवून शाळा सुटली.दुस-या दिवशी येवून पहिले तर सर्व विस्कळीत झाले होते.सार्वजन हिरमुसले मी गाडीतून उतरेपर्यंत सर्व मुलांचा घोळका माझ्या गाडीभोवती सर आपला किल्ला मोडला  आता काय करायचे?मग मी म्हणालो किल्ला मोडला ? कोणी मोडला ? माहित नाही सर ,मोठी मुले इकडे व्यायामाला येतात त्यांनी मोडला असेल .मग सुरजने प्रश्न विचारला मग शिवरायांच्या काळात पण किल्ले मोडत असत का ?मी म्हणालो धोका तर होताच पण त्याच्या रक्षणासाठी त्यांनी पहारेकरी ठेवले होते.मग मुले म्हणाली आपण पण ठेवूया, मी शक्य नाही म्हणालो,मुले म्हणाले दररोज २ मुले यांची जबाबदारी घेतील असे ठरले.
                              दुस-या दिवशी दगडावर माती टाकून त्यावर बारादाण्याची पोते टाकून चिखलाचे  वेगवेगळया आकाराचे गोळे लिंपणे सुरु झाले.प्रत्येकजण आपल्या परीने काम करत होता.निर्मितीचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता.किल्ल्याच्या पायथ्याला एक तलाव बनवला पाणी जमिनीत जावू नये म्हणून प्लास्टिक कागद खाली टाकून त्याला मातीने वरच्या बाजुला लिंपून मग त्यात पाणी टाकले. भुयारे केली, बुरुज करताना कितीतरी वेळा पडायचा मग पुन्हा बनवायचो, तोफांची जागा बनवली. किल्यावर जाण्याच्या ३ वाटा बनवल्या. पहारेक-या च्या जागा बनवल्या. वर सपाट भाग करून राजमहाल. दरबार, बाजार, घरे, मंदिर या सर्व बाबी बनवून घेतल्या शेवटी तटबंदी साठी माती कमी पडू लागली पुन्हा काम थांबले मग दुस-या दिवशी ते काम पूर्ण झाले.
                                    किल्ला पुर्णत्वा कडे जात असताना त्यावर काळी माती टाकून त्यात धान्य टाकले माती दुरून गाडीवर जावून पोत्यात आणली,४ दिवसांनी त्या माती हिरवेगार धान्य उगवून आले,शिवरायांची मूर्ती वरच्या बाजूला बसवली बाजारातून सैनीक विकत आणले जागोजागी सैनिक ,प्राणी, जलचर प्राणी तलावात सोडले, वाघ, हत्ती, सिंह जंगलात उभे केले. आता किल्ल्याला ४ दिवसानंतर रंग देण्याचे  काम सुरु केले विविध रंगातील रंगीत किल्ला  पाहण्यासारखा झाला.
                              आता किल्याच्या रक्षणासाठी मुले सूर्यास्ता वेळी आणि सुर्यदया वेळी शाळेत येवून रक्षण करू लागले. यामुळे मुलांना वाटायल लागले एवढा छोटा किल्ला बनवायला एवढे कष्ट लागत असल्यास शिवरायांनी हे सर्व कसे केले असेल? आपण त्याची जपणूक करावी असे मुलांना स्वात: वाटायला लागाले.एकत्रित काम केल्याने एकता हा गुण त्यांच्यात आपोआप निर्माण झाला.निर्मिती बद्दल काष्टा बद्दल त्यांना जाणीव झाली, रक्षण काय असते हे माहित झाले,सर्व प्रकारची मूल्य आपोआप रुजू लागली. यामुळे उद्याचे चांगले अभियंते निर्माण होतील,पुढच्या पिढीला आपला इतिहास ,संस्कृती याचा वसा जोपासण्याचा मार्ग दाखवतील.आज सर्वजन अभिमानाने सांगतात मी किल्ला बनवला त्याचे रक्षण मी करणार, आम्ही किल्लेदार आहोत. आम्ही शिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहोत खरे किल्लेदार आमचे विद्यार्थी आहेत.

                                                बालाजी बाबुराव जाधव
                                          उपशिक्षक,जि.प. प्राथ शाळा विजयनगर 
                                          ता. माण जि . सातारा ७५८८६११०१५

No comments: